एसबीपीआयएम मध्ये उद्योजक परिचय शिबीर संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी वित्तीय संस्था, बँका, शासनाचे नियम व अटी, यासाठी लागणारे मनुष्यबळ, उत्पादीत वस्तूची मागणी, विक्री पश्चात सेवा आणि स्पर्धेत टिकण्याची तयारी याबाबत सूक्ष्म नियोजन आवश्यक असल्याचे मार्गदर्शन ज्येष्ठ उद्योजक रामदास माने यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या निगडी येथील एसबी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी रामदास माने बोलत होते. या वेळी उद्योजकता विकास केंद्राचे पुणे विभागीय संचालक सुरेश उमाप, एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनियल पेनकर, प्रकल्प अधिकारी मिलिंद लोंढे आदी उपस्थित होते. या वेळी रामदास माने यांच्या जीवनावर ‘ग्रामीण भागातील विद्यार्थी ते यशस्वी उद्योजक’ चित्रफित सादर करण्यात आली.
रामदास माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागात अशिक्षित कुटुंबात जन्म घेऊन गरजेपुरते शिक्षण घेऊन मी नोकरीच्या शोधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये आलो. आलेल्या संकटांचा सामना करत संधी मिळताच स्वत:चा व्यवसाय सुरु केला. स्वत:च्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून काबाड-कष्ट करून शेकडो गरजू हातांना रोजगार देऊ शकलो. राष्ट्रीय स्वच्छता अभियानासारख्या केंद्र व राज्य सरकारच्या अभियानामध्ये माने ग्रुप ऑफ कंपनीजचे उत्पादन घेतले जाते. थर्माकोल बनविणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आणि सर्वात मोठे थर्माकोल उत्पादन करण्याचा विक्रम कंपनीच्या नावे आहे. हे साध्य करण्यासाठी ध्येयाने प्रेरीत होऊन मी काम केले. यासाठी सूक्ष्मपणे नियोजन करून बाजारातील मागणी, पुरवठा, विपनण व्यवस्था, कमी खर्चात उत्पादन, मनुष्यबळाचा योग्य वापर या गोष्टींवर मी बारकाईने काम केले. उद्योजक होण्यासाठी उद्योगपतींच्याच घरी जन्माला यावे, असे काही नाही. तर अचूक संधी शोधून योग्य वेळी निर्णय घेऊन कष्टातून देखील उभे राहता येते असेही मार्गदर्शन माने यांनी केले.
डॉ. डॅनीअल पेनकर म्हणाले की, तरुणांनी नोकरी व उद्योग यापैकी एक निवडण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा उद्योगाची निवड करावी. आज देशाला तरुण उद्योजकांची गरज आहे. उद्योग धंद्याच्या वाढी बरोबरच रोजगार निर्मिती होईल आणि देशाची आर्थिक प्रगती होईल. विद्यार्थीदशेपासूनच यशस्वी उद्योजक होण्याचा ध्यास घेऊन प्रयत्न केले पाहिजेत.
या कार्यक्रमाचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
एमसीईडीचे विभागीय संचालक सुरेश उमाप, अशोक पत्तर, पंडीत गावडे , सुनील शेटे , सुभाष रणदिवे या तज्ज्ञांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या समारोपप्रसंगी यशस्वी उद्योजक सचिन गायकवाड, डॉ . कीर्ती धारवाडकर आणि हेमंत भागवत उपस्थित होते.
यामध्ये व्यवस्थापन शाखेच्या १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे संयोजन डॉ . हंसराज थोरात, सूत्रसंचालन प्रा. प्रणिता बुरबुरे तर प्रा. ऋषिकेश कुमार यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group