पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरात विविध विकासकामे करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून नव्याने विकसित करण्यात आलेल्या सांगवी किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सबवे बांधणे तसेच महात्मा ज्योतिबा फुले पुलाखाली तयार करण्यात आलेल्या बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्पाचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.

सांगवी येथील महात्मा फुले उड्डाणपूलाखालील झालेल्या कार्यक्रमास ह प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, शिक्षण समिती सभापती रविना आंघोळकर, नगरसदस्य ज्ञानेश्वर जगताप, शशिकांत कदम, शाम जगताप, नवनाथ जगताप, दिप्ती कांबळे, पल्लवी जगताप, शहर अभियंता मनोज सेठीथा,सह शहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनिल पवार,उप अभियंता चंद्रकांत मोरे तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सांगवी फाटा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुलाखालील मोकळ्या जागेचा प्रभावी वापर करत बहुउद्देशीय विरंगुळा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये नागरिकांसाठी आकर्षक सुशोभीकरण, फिरण्यासाठी मार्ग, बैठकीची व्यवस्था, व्यायामासाठी सुविधा, खुली जागा तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी उपयुक्त परिसर विकसित करण्यात आला आहे. पूर्वी दुर्लक्षित असलेल्या जागेचे लोकाभिमुख सार्वजनिक स्थळात रूपांतर झाल्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याचे केंद्र उपलब्ध झाले आहे.

शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन महापालिकेकडून सांगवी–किवळे मार्गावरील रक्षक चौक येथे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्यात आला आहे त्याचेही लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास ज क्षेत्रीय अध्यक्षा आरती सुरेश चोंधे, नगरसदस्य अँड. विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, नगरसदस्या स्नेहा कलाटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता प्रेरणा शिनकर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, कार्यकारी अभियंता विजय भोजने, उपअभियंता निलेश दाते यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, विविध विभागांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते सचिन साठे, काळूराम बारणे, भुलेश्वर नांदगुडे, काळूराम नानगुडे, अनिल संचेती, प्रसाद कस्पटे, बाळासाहेब चोंधे, तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी २२ कोटी ७७ लाख इतका खर्च आलेला असून या कामाचा आदेश ६ सप्टेंबर २०२४ रोजी देण्यात आला होता आणि प्रकल्पाचे काम १० जुलै २०२६ रोजी पूर्ण झाले आहे.या प्रकल्पांतर्गत सुमारे २६.४० मीटर लांबीचा व ११.४० मीटर रुंदीचा आरसीसी बॉक्स सबवे उभारण्यात आला आहे. तसेच सांगवी फाटा व जगताप डेअरी चौकाच्या बाजूस रॅम्पची उभारणी करण्यात आली असून पादचाऱ्यांसाठी २६.४० मीटर लांबीचा व २.५० मीटर रुंदीचा स्वतंत्र पदपथ विकसित करण्यात आला आहे. या सबवेमुळे सांगवी–किवळे मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक सिग्नलविरहित आणि अधिक सुरळीत होणार असून वाहतूक कोंडीत मोठी घट होईल. परिणामी नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच इंधनाची बचत आणि सुरक्षित प्रवासालाही चालना मिळणार आहे.
लोकार्पणानंतर बोलताना आमदार शंकर जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा दर्जेदार आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले तसेच रस्त्यावरील वाहतूक ही कोंडीमुक्त, सुरक्षित करण्यासाठी महापालिका कामकाज करीत आहे तसेच नागरिकाभिमुख शहर उभारण्यासाठी भविष्यातही अशाच लोकहिताच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




















Join Our Whatsapp Group