हिंजवडी (Pclive7.com):- नेरे गावातील बांधकाम साईटवर राहणाऱ्या एका कामगाराचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हातपाय वायरमे बांधून विहिरीत फेकून हा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पश्चिम बंगालमधील एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजण्यापूर्वी नेरे येथील सर्व्हे क्रमांक 61 परिसरातील विहिरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख सुमन पात्रा (मूळ रा. सिमुलताला, नादिया, पश्चिम बंगाल) अशी झाली आहे. तो नेरे येथील बांधकाम साईटवर काम करत होता.
या प्रकरणी रामदास पांडुरंग मेमाणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तपासादरम्यान पोलिसांनी संतु उर्फ विशाल वासुदेव मांजी (वय 22, रा. चूर्णीपोता, नादिया, पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे.

प्राथमिक तपासात आरोपीने सुमन पात्रा याच्या डोळ्यांवर, कपाळावर व कानाच्या वरच्या भागावर मारहाण करून त्याचे हात-पाय आणि कंबर वायरने बांधून त्याला विहिरीत फेकल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार हे करत आहेत.




















Join Our Whatsapp Group