पिंपरी (Pclive7.com):- मागील अनेक वर्षापासून फक्त वृक्षखरेदी आणि लागवड होते. मात्र आतापर्यंत किती झाडे जगली, किती मेली याची भक्कम माहिती उद्यान विभागाकडून मिळालेली नाही. अंदाजे अाकडेवारी सांगितली जाते. त्यामुळे उद्यान विभागाने खरी माहिती द्यावी, त्यानंतर स्थायी समिती सदस्य पाहणी दौरा करतील. तेव्हाच उद्यान विभागाच्या बजेटला मंजुरी दिली जाईल अशी तंबी स्थायी समिती बैठकीत सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
महापालिकेच्या मधुकर पवळे सभागृहामध्ये मंगळवारी (दि.२२) स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. विषयपत्रिकेवर २०१९-२० चे वृक्षप्राधिकरण समितीचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र उद्यान विभागाकडून झाडांच्या बाबतीत माहिती मागवण्यात आली होती. ती माहिती अपूर्ण माहिती मिळालेली आहे. आतापर्यंत दरवर्षी ५० ते ६० हजार वृक्षारोपण केले जाते. महापालिकेकडून फक्त झाडांची खरेदी आणि लागवड ऐवढेच विषय आतापर्यंत होताना दिसून आले आहेत. आतापर्यंत किती झाडे उद्यान विभागाने जगवली, किती मेली याची खरी माहिती दिली जात नाही. मोघम माहिती या विभागाकडून प्राप्त झाली आहे. जोपर्यंत खरी आणि संपूर्ण माहिती मिळणार नाही. तोपर्यंत बजेटला मंजुरी दिली जाणार नाही अशी तंबी स्थायी समितीकडून अधिकाऱ्यांना देण्यात आली.
उद्यान विभागाकडून पुढील बैठकीत जगवलेल्या, मेलेल्या झाडांची संपूर्ण माहिती द्यावी अशी मागणी सदस्यांनी केली. माहिती मिळाल्यानंतर स्थायीचे सर्व सदस्य प्रत्यक्ष पाहणीदौरा करतील, त्यानंतर बजेटला मंजूरी दिली जाईल अशी सूचना स्थायी सभापती आणि सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
























Join Our Whatsapp Group