पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील इतर बस स्थानकेही विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी ४० वास्तुविशारदांची नेमणूक केली आहे. स्थानिक गरजा लक्षात घेऊन या बस स्थानकांचा आराखडा तयार केला जाईल. त्यात ‘मिनी थिएटर’चाही समावेश करण्यात येणार आहे. वाहक, चालकांच्या गरजा लक्षात घेऊन एसटी स्थानकातील विश्रांतीगृहाचा कायापालट लवकरच होणार असल्याचे मत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पिंपरी येथे व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वल्लभनगर एसटी आगार येथील वाहक, चालक यांच्या नूतनीकृत विश्रांतीगृहाचे उद्घाटन राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते व वाहतुक नियंत्रक आय. वाय. शेख त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, डिस्ट्रीक्ट गर्व्हनर ३१३१चे डॉ. शैलेश पालेकर, सचिव महादेव शेंडकर, अनिल नेवाळे, प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनने पिंपरीतील वल्लभनगर आगाराचा कायापालट केला. चालक, वाहकांना रात्री झोपण्यासाठी डबलबेडची व्यवस्था करण्यात आली आहे. भिंतीना रंग, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेत्चायदृष्टीने आगारात सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारात राज्यभरातून बस येतात. रात्रीच्या मुक्कामी बसवरील चालक, वाहकांना आगारात झोपण्यासाठी व्यवस्था नव्हती. त्यांना थंडीच्या दिवसामध्ये जमिनीवर झोपावे लागत होते. त्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्यावतीने ७५ डबलबेड बसविले आहेत. त्यावर १५० चालक, वाहक झोपू शकतात, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आगारात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भिंतीना रंग देऊन चकाचक करण्यात आल्या असून आगारातील स्वच्छतागृहांची देखील दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी ही विश्रांतीगृह असून त्याठिकाणी सर्व सोयी सुविधा असल्याचे असे रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे यांनी सांगितले.
दिवाकर रावते पुढे म्हणाले, आगारात मुक्कामी आल्यानंतर चालक, वाहक यांना मनस्वास्थ्य मिळावे यासाठी विश्रांतीगृहात स्वच्छता ठेवावी. आगारातील प्रसाधनगृहे व्यवस्थित असावीत. विमानतळावर जशी प्रसाधनगृहे आहे तशीच प्रसाधनगृहे पुढील पाच ते सात वर्षात एसटी च्या प्रत्येक आगारात याचे बदलले रुप पहायला मिळणार आहे.
यावेळी या नूतनीकृत विश्रांतीगृहामध्ये ज्यांनी ज्यांनी हकार्य केले त्यांचा यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.