पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी येथील कोकणे चौकाजवळील पुणेकर ज्वेलर्सवर आज सकाळी साडे अकरा वाजता ५ जणांनी सशत्र दरोडा घातला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात या दुकानाचा मालक गंभीर जखमी झाला आहे. या दरोड्यात सुमारे तीन ते साडेतीन किलो वजनाचे सोन्याचे दागिणे चोरीस गेल्याची माहिती समोर येत आहे.

दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्य वेदांत रेसिडेन्सी, रहाटणी, पुणे) असे गोळीबारात जखमी झालेल्या ज्वेलर्स दुकानदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडे अकरा वाजता दुचाकीवरून आलेले पाच जण पुणेकर ज्वेलर्समध्ये घुसले. आत घुसताच त्यांनी दुकानाचे शटर बंद केले. त्यानंतर बंदूकीचा धाक दाखवून काऊंटरवर बसलेल्या दुकानदार दिव्यांक याला तिजोरी उघडायला लावली. तिजोरीतून सुमारे तीन ते साडे तीन किलो वजनाचे सोन्याचे दागिण्यासह दुकानातील सर्व दिगिने काढून दरोडेखोरांनी ते सोबत आणलेल्या बँगेत टाकले. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आपला मोर्चा काऊंटरकडे वळवला. काऊंटर असलेला सीसीटिव्ही कँमेऱ्याचा डिव्हीआर त्यांनी काढून घेतला. यावेळी त्यांच्यात आणि दुकानदार दिव्यांक यांच्यात झटापट झाली. त्यावेळी दरोडेखोरांनी दिव्यांकच्या दिशेने एक गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी दिव्यांकच्या डाव्या पायाला लागली. त्यानंतर सर्व दरोडेखोर मुद्देमाल घेऊन पसार झाले. या गोळीबारात दिव्यांक जखमी झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी दुकानदारची विचारपूस केली.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी याप्रकरणाची पूर्ण माहिती घेतली असून आजूबाजूचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यावरून पोलीसांनी त्यांची पथके आरोपींच्या मागावर पाठवली आहेत.
पिंपळे सौदागर, रहाटणीसारख्या परिसरात असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानावर भरदिवसा गोळीबारासह पडलेला दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी भीतीच्या वातावरणात आहेत.






















Join Our Whatsapp Group