पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला उद्भवणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प गरजेचा आहे. परंतू माझ्या महापौर पदाच्या कार्यकाळात हा प्रश्न मार्गी लावू शकलो नाही. आयुष्यभर ही ‘खंत’ मनात राहील अशी भावना महापौर राहुल जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाळ आज (दि.२१) संपत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापौरांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध कामांची जंत्री पत्रकार परिषदेत मांडली. महापौर म्हणाले की, शहरातील शाळा, उद्याने, क्रीडांगणे, नदी, नाले, स्मशानभूमी यांची पाहणी करुन आवश्यक त्या सुधारणा केल्या. १५ महिन्यांच्या कारकिर्दीत चार वेळा परदेशात दौरे केले. परदेशात आपल्या शहराचा विकास मांडण्याची संधी मिळाल्याचा मोठा आनंद आहे. शहरातील सर्व आरक्षित जागांची प्रथम माहिती घेऊन सोयी-सुविधांचे कामकाज विभागांच्या माध्यमांतून सुरु करून देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रभागात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला. प्रथमच नव्याने समाविष्ट गावांसाठी रस्ते विकास धोरण राबविले. या अंतर्गत सुमारे ४२५ कोटींचे ५० नवीन रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. जाधववाडी प्रभागातील साई जीवन शाळेजवळ मैदान विकसित केले. जाधववाडीमधील गट नं.५३९ विकसित केला. जाधववाडी मधील गट नंबर ६०६ आरक्षण क्र.१/४४६ येथे माध्यमिक शाळेची इमारत बांधली. बोऱ्हाडेवाडी येथील ताब्यात येणाऱ्या गायरान जागेतील शाळा बांधण्याचे काम केले. जाधववाडी, कुदळवाडीमधील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण केले. रस्ते विकसित केले.स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराची ओळख वाढत आहे. स्मार्ट सिटीमुळे शहराचा नावलौकिकात भर पडत आहे. जगाच्या नकाशावर विकसनशील असे पिंपरी चिंचवड शहर भविष्यात दिसेल. शहरात लवकरच मेट्रो धावणार आहे. पुढील काही महिन्यात नागरिकांना मेट्रोची सुविधा मिळेल, असा विश्वासही महापौर जाधव यांनी व्यक्त केला. शेवटी पवना बंद जलवाहिनी बरोबरच सिटी सेंटर आणि महापौर निवास उभारता आले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.
























Join Our Whatsapp Group