
पुणे (Pclive7.com):- “शिवसेना नाव काढून ठाकरे सेना करा, शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं होतं का? महाशिवआघाडीतून शिव हे नाव का काढलं?” अशा प्रश्नांचा भडिमार करत साताऱ्याचे माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेसह राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले. भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरील वादावरुन पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी चहूबाजूने टीका केली. या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी पुस्तकावरील वादापेक्षा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लक्ष्य केलं.
भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन प्रचंड वाद झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी याबाबत बोलावं अशी मागणी केली होती. यावरुन छत्रपती संभाजीराजे आणि राऊत यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यानंतर आज उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडत शिवसेनेवर टीका केली.
शिवाजी महाराजांच्या नावाचं फक्त राजकारणच सुरु आहे, असंही उदयनराजे म्हणाले. शिवसेनेवर टीका करताना उदयनराजे म्हणाले की, “शिवसेनेच्या नावाला आम्ही कधी आक्षेप घेतला नाही. पण शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं होतं का? या पत्रकार परिषदेत मुंबईतील शिवसेना भवनचा फोटो दाखवत यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कुठे आणि शिवाजी महाराजांचा कुठे आहे? असा प्रश्न विचारला. तसंच शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील आमदार गजभिये मुजरा करत असतानाचा फोटो दाखवत, याचं उत्तर द्यावं लागेल असंही म्हटलं.
याशिवाय वड्याला शिववडा हे नाव देण्यावरुन, तीन शिवजयंती साजरी करण्यावरुन उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली. शिववडा हे नाव का दिलं? तीन शिवजयंती का करता? महाराजांची अजून किती मानहानी करणार असा प्रश्न त्यांनी विचारला.
“महाराजांचं नाव काढलं तर त्या हिशेबाने वागा, नाहीतर त्यांचं नाव घेऊ नका. गलिच्छ राजकारणाचं खापर फोडायचं प्रयत्न करु नका. समज देतोय नाहीतर परिणामाला सामोरं जावंच लागेल,” असा इशारा उदयनराजेंनी दिला. तसंच मी जनतेला सांगू इच्छितो शिवाजी महाराज फक्त आमच्या कुटुंबाचे नाहीत, ते तुमचेही आहेत. तुम्ही सुद्धा त्यांच्या विचारांचे वारस आहात, असंही त्यांनी सांगितलं.
‘जाणता राजा’ फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच..!
उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजा म्हणून तुलना करण्यालाही आपला विरोध आहे. कोणी त्यांना ही उपमा दिली देवास ठाऊक,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे नाव न घेता लगावला आहे.
























Join Our Whatsapp Group