पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपमध्ये उभी फूट पडली आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये बेबनाव झाला असून त्याचा फटका बुधवारी (दि.१२) स्थायी समितीत भाजपला बसला. वाकड येथील रस्ते विकासाच्या कामांना केवळ राहुल कलाटे यांचे काम होते म्हणून आमदार जगताप समर्थक नगरसेवकांनी विरोध केला. तर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या बाजूने महेश लांडगे समर्थक नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही भक्कम पाठबळ उभे केले. त्यामुळे रस्ते विकासाचा प्रस्ताव ५ विरुद्ध ८ मतांनी मंजूर झाला. विषय मंजूर होताच जगताप समर्थकांनी थयथयाट करत सभात्याग केला. कलाटे यांनी विषय मंजूर करून घेत आमदार जगताप यांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी पार पडली. संतोष लोंढे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. स्थायी समितीच्या मागील दोन सभा तहकूब झाल्याने त्यांचे कामकाज आज पार पडले. २९ जुलैच्या विषय पत्रिकेवर वाकड, ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक २५ मधील रस्ते विकास कामाचे सुमारे ७५ कोटी रुपये तर शाळा इमारत बांधण्याचा सुमारे २४ कोटी रुपयांचा असे एकत्रित १०० कोटीचे विषय पत्रिकेवर होते. आयुक्तांनी मांडलेल्या या चारही प्रस्तावांना भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेवकांनी विरोध केला आहे. या चारही निविदांची प्रक्रिया, आर्थिक तरतूद, ठेकेदारांची स्पर्धा, सल्लागार नियुक्ती असे सर्व सोपस्कर पार पडले होते. याची संपूर्ण माहिती मिळावी तसेच, अभ्यासासाठी हे चारही विषय १५ दिवस तहकूब ठेवावेत, अशा मागणीचे लेखी पत्र स्थायी समितीतील जगताप समर्थक शशिकांत कदम, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, झामाबाई बारणे, आरती चोंधे या सदस्यांनी २९ जुलै रोजी सभापती संतोष लोंढे यांना दिले होते.
आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात विधानसभा निवडणुकीपासून जोरदार द्वंद्व सुरू आहे. त्याचा प्रत्यय स्थायी समिती सभा कामकाजात उमटत आहे. वाकड प्रभागाचे प्रतिनिधित्व राहुल कलाटे करत असल्याने ’अडवा आणि जिरवा’ धोरण जगताप समर्थकांनी अवलंबविले आहे. आजच्या स्थायी समिती सभेतही जगताप समर्थक नगरसेवकांनी वाकडच्या विकास कामांना विरोध केला. वाकडचे चारही विषय फेटाळून लावा, असा आग्रह स्थायी समिती सभापतींकडे धरला. तर, सभापतींनी मवाळ भूमिका घेत प्रस्ताव तहकूब करू अशी सुचना केली. तर, वाकडमधील शाळा इमारत, रस्ते विकासाची गरज असल्याचे कलाटे यांनी सांगितले. जगताप समर्थक ऐकत नसल्याने शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आक्रमक भूमिका घेत मतदानाची मागणी केली.
त्या मागणीनुसार ताथवडे येथील शनिमंदिराकडून मारुंजीगावाकडे जाणाऱ्या ३० मीटर रूंद रस्त्याच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. या मतदानावरून भाजप नगरसेवकांमध्ये उभी फूट पडली. आमदार जगताप समर्थक शशिकांत कदम, अभिषेक बारणे, संतोष कांबळे, अंबरनाथ कांबळे, आरती चोंधे या पाच सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. तर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या बाजूने भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे गटाचे राजेंद्र लांडगे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, विजय उर्फ शीतल शिंदे, राष्ट्रवादीचे मयुर कलाटे, पंकज भालेकर, सुलक्षणा धर यांनी मतदान केले. त्यामुळे प्रस्ताव पाच विरुद्ध आठ मतांनी मंजूर झाल्याचे सभापती संतोष लोंढे यांनी जाहीर केले. प्रस्ताव मंजूर होताच जगताप समर्थक पाचही नगरसेवकांनी सभात्याग केला. तर, वाकड येथील शाळा इमारत बांधणे (१९ कोटी ९९ लाख रुपये) विषयही मंजूर करण्यात आला.
सत्ताधारी भाजपचे यापुर्वीचे स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या काळात हे विषय मांडण्यात आले होते. त्यावेळी सल्लागार नियुक्ती, निविदा पासून सर्व काम झाले होते. तेव्हाढ्यात मडिगेरी यांची टर्म संपली आणि संतोष लोंढे नवीन अध्यक्ष झाले. राहुल कलाटे यांनी पाठपुरावा करून ही कामे किती महत्वाची आहेत हे पटवून दिल्याने ती मंजूर कऱण्याचे ठरले. मात्र आमदार जगताप समर्थकांनी ती होऊच नयेत यासाठी सर्व ताकद पणाला लावली. त्यांचा डाव फसल्याने आमदार जगताप यांना ही सणसणीत चपराक असल्याचे सांगण्यात येते. विषय मंजुरीपेक्षा कट्टर राजकीय विरोधक राहुल कलाटे यांच्या बाजुने संख्याबळ अधिक झाल्याने आमदार जगताप यांचा एकप्रकारे पराभव झाल्याचे मानले जाते.
























Join Our Whatsapp Group