पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.४) झालेल्या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अशोक पवार, आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, गृह विभागाचे अपरमुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे (व्हीसीव्दारे), पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराच्या लगतच्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चतु:श्रृंगी व हिंजवडी पोलीस ठाण्यातून नवीन बाणेर पोलीस ठाणे तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण जवळील म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव अशा नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्यात आली आहे.
तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला दोन कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group