पिंपरी (Pclive7.com):- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व महापालिका मुख्यालयातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ‘क’ व ‘ड’ वर्गातील कर्मचाऱ्यांची ५० टक्केच उपस्थिती ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी मंगळवारी काढला. केली आहे. ३१ मार्चपर्यंत या तृतीय व चतुर्थ श्रेणातील कर्मचाऱ्यांनी आळीपाळीने उपस्थित रहायचे आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास कार्यालयामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य राहील; वैद्यकीय, आरोग्य, पाणीपुरवठा व विद्युत अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
गेल्या महिन्यापासून शहरातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला ८०० च्या पुढे नवीन रुग्ण सापडत होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी वगळता महापालिका कार्यालयांतील दैनंदिन उपस्थिती ५० टक्के ठेवण्यात येणार आहे. मात्र, ‘अ’ व ‘ब’ अर्थात प्रथम व द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांची उपस्थिती शंभर टक्के राहणार आहे. इतर कर्मचाऱ्यांची दैनंदिन ५० टक्के उपस्थिती रोटेशन पद्धतीने निश्चित केली जाणार आहे.
गर्भवती महिला, अवयव प्रत्यारोपण केलेले, केमोथेरपी, इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सवलत राहील. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यापासून देण्यात आलेली सवलत पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. मात्र, जे दिव्यांग कर्मचारी स्वेच्छेने कार्यालयात उपस्थित राहू इच्छितात, त्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे.
तसेच, महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यक्षेत्र सोडू नये. विभागप्रमुखांनी आवश्यकता भासल्यास कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यास सूचना दिल्यास संबंधितांनी कोणतेही कारण न सांगता तत्काळ उपस्थित राहणे बंधनकारक राहील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
























Join Our Whatsapp Group