पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड मधील हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीकडे (एचए) दिवसाकाठी ५ लाख लस निर्मिती करण्याची क्षमता आहे. त्यासाठी कंपनीकडून केंद्र सरकारकडे परवानगी मागितली असून त्या बाबत चर्चा सुरू आहे. ही परवानगी मिळाल्यास नंतरच्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण पुणे जिल्ह्याची लसीची अडचण संपेल असा दावा कंपनी व्यवस्थापनाने केला आहे.
देशातील पहिला औषधी कारखाना अशी एचए कंपनीची ओळख आहे. कंपनीकडून आजपर्यंत अल्प दरात औषधे देशाला पुरविली आहेत. सध्या जगभराबरोबरच देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यावर उपाय म्हणुन अनेक खासगी कंपन्यांनी लस निर्मिती सुरू केली आहे. मात्र त्यांच्याकडून पुरेसे उत्पादन होत नाही. त्यामुळे पुण्यासह देशात लसींचा साठा अपुरा पडत आहे. या अडचणीच्या काळात एचए कंपनीकडून पुढाकार घेत लस निर्मिती करण्याची ईच्छाशक्ती व्यक्त केली आहे.
कंपनी व्यवस्थापनाने रेमडीसिविर इंजेक्शन व लस निर्मितीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहेत. ही परवानगी मिळाल्यास दोन ते तीन महिन्यानंतर ५ लाख लस दिवसाकाठी निर्माण केल्या जातील. त्यासाठी पूर्ण यंत्रणा असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. काही मशिनरी अत्याधुनिक कराव्या लागतील. मात्र आम्ही सज्ज असल्याचे व्यवस्थापन सांगत आहे. कच्चा माल, एकूणच यंत्रणा या वरून लसीची किंमत ठरवली जाईल असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र ही लस नागरिकांना इतरांपेक्षा अल्प दरात असेल, असा विश्वास कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केला.
कंपनीकडून दिवसाकाठी १२ हजार हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती
कंपनीद्वारे हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती केली जात आहे. दिवसाकाठी ६ हजार ते १२ हजार हॅण्ड सॅनिटायझर निर्मितीची क्षमता कंपनीकडे आहे. मागील वर्षी पिंपरी चिंचवड महापालिकेला कंपनीकडून १ कोटी रुपयांचे हॅण्ड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.
























Join Our Whatsapp Group