पुणे (Pclive7.com):- पत्नीला सिगारेटचे चटके देत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी उद्योजक पती व कुटुंबातील तिघांसह आठ जणांवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीशी संबंधित अध्यात्मिक गुरुंना चतुःश्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

रघुनाथ राजाराम येमुल (वय ४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवररी इस्टेट, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या गुरुजींचे नाव आहे. या प्रकरणी २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली असून, तिच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून, पती व अन्य एक आरोपी फरार आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली.
रघुनाथ येमुल यांनी फिर्यादीच्या पतीला फिर्यादी पांढऱ्या पायगुणाची असून, तिची जन्मवेळ चुकीची असल्याने ग्रहमान दूषित झाले आहे, ती तुझी बायको राहिली तर तू आमदार व मंत्री होणार नाही, त्यामुळे तिला सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे, असे सांगितले व तिच्यावरून लिंबू उतरवण्यासाठी दिले. संसार मोडण्यासाठी अनिष्ठ रुढी व अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे फिर्यादीने पुरवणी जबाबात नमूद केल्यानंतर येमुल यांना अटक करण्यात आली.
येमुल गुरुजींचे राजकीय, प्रशासकीय विभागात कनेक्शन
येमुल गुरूजींचे राजकीय पासून प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांशी नजीकचे संबंध आहेत.आपला हात पाहण्यासाठी अनेकजण गुरूजीच्या दरबारात हजेरी लावतात. त्यामुळे संबंधीत प्रकरणात गुरूजीला अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरूजीला अटक केल्यानंतर त्याला ज्या पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे त्याचे भक्त त्याला भेटण्याचा प्रयत्न करीत होते.






















Join Our Whatsapp Group