पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचे संकटामुळे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षापासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. खाजगी शिक्षण संस्थांकडून ऑनलाईन शिक्षणासाठी पूर्वीप्रमाणेच फी आकारली जात आहे. त्यातच सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य नागरिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. गोरगरिब आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळेच राज्य सरकारने सर्व खाजगी शाळांनी फी मध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मात्र तरी देखील अनेक शाळांनी पालकांकडून पूर्ण फी आकारल्याचे प्रकार समोर येत आहेत.
पिंपरी चिंचवड शहात त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. आज मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे यांच्या नेतृत्वात शिष्ठमंडळाने महापालिकेच्या शिक्षण मंडळात धडक मारली. यावेळी शहरातील खाजगी शाळांकडून सुरू असेलेल्या ‘फी’ बाबतच्या मनमानी विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिक्षण समितीचे उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष हेमंत डांगे यांच्यासोबत उपशहर अध्यक्ष अनिकेत प्रभु, विभाग अध्यक्ष प्रतिक शिंदे, संघटक विक्रम आडे, उपविभाग अध्यक्ष सुमित कलापूरे, उपविभाग अध्यक्ष रोहीत काळभोर, सोमनाथ स्वामी, मयुर फड, राहुल लोखंडे, वैभव वाघ, विशाल भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण विभागाला मनसेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मार्च 2020 पासुन राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक पालकांच्या नोकरी, रोजगार गेले आहेत. सर्व पालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच सर्व शाळा बंद असुन ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्याने शाळेतील कोणत्याही सुविधा वापरल्या नसताना सर्व शाळांकडुन १०० टक्के ‘फी’ वसुलीचा तगादा लावलेला आहे. फी भरली नसल्याने विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा विचार न करता त्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवण्यासारखे गंभीर प्रकार देखील काही शाळांनी केलेले आहेत. शाळांच्या या मनमानी कारभाराला पालक देखील वैतागले आहेत. परंतू गप्प बसण्याशिवाय कोणताही पर्याय पालकांकडे नाही.
दरम्यान नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चालु शैक्षणिक वर्षांपासुन (2021-22) राज्यातील सर्व खाजगी शाळांनी फी मध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व खाजगी शाळांनी चालू शैक्षणिक वर्षांची ज्या पालकांकडून संपुर्ण फी घेतली आहे, त्यातील १५ टक्के रक्कम परत करावी, याबाबतचे परिपत्रक काढावे. याबाबत त्वरीत कार्यवाही व्हावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
























Join Our Whatsapp Group