पिंपरी (Pclive7.com):- ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यावतीने आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी २ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आज (दि.०३) सकाळी ६ वाजता निगडी भक्ती-शक्ती चौक येथून सायक्लोथॉन स्पर्धा सुरू झाली.
१ ते ३ ऑक्टोबर या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार शहरामध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आज सायक्लोथॉन स्पर्धा संपन्न झाली. उपमहापौर नानी घुले, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी झेंडा दाखवून स्पर्धेची सुरूवात केली.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, मनसे गटनेता सचिन चिखले, नगरसेविका शैलजा मोरेे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदाडे, कार्यकारी अभियंता बापु गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे आदी उपस्थित होते.
ही स्पर्धा तीन प्रकारात घेण्यात आली. यात लहान मुले, सर्वसाधारण गट तसेच सराव करणा-या खेळाडूंसाठीचा गट तयार करण्यात आला होता. ७ किलो मीटर, १५ कि.मी. आणि ७५ कि.मी. अंतराची ही स्पर्धा होती. स्पर्धेचे अंतर पूर्ण करणा-या खेळाडूंचा पदक देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी महापालिका डॉक्टरांच्या पथकाची व्यवस्था स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आली होती.

























Join Our Whatsapp Group