पिंपरी (Pclive7.com):- महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळीकरण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या या सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही, आणि महाविकास आघाडी सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे.
जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरा देखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे ते म्हणाले.
गेल्या महिना अखेरीपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या २८ लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे. शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या ९७३ कोटींच्या रकमेपैकी शेतकऱ्याच्या हातात फुटकी कवडी देखील पडलेली नाही.
सरकारी अधिकारी व दलालांनी संगनमत करून राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले असताना, या पिकाच्यामोठ्या उत्पन्नाचे आमीष दाखवून प्रमाणावर शेतकऱ्याची दिशाभूल केली. भेसळयुक्त खते, निकृष्ट बियाणे आणि फसवणुकीमुळे शेतकरी अगोदरच नागविला गेला असताना, अतिवृष्टीमुळे हातचे पीक वाया गेल्यावर मात्र राज्य सरकार मूग गिळून गप्प आहे, असा आरोप श्री. महेश लांडगे यांनी केला. सप्टेंबर महिन्यात क्विंटलला ११ हजारापर्यंत मिळणारा भाव आता चार ते पाच हजारांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्याने माल बाजारात आणणे थांबविल्याने आवकही थंडावली असून शेतकऱ्याच्या हाती पैसा नसल्याने दिवाळी अंधारात जाणार आहे.
शेतकाऱ्यांची महाविकास आघाडीकडून थट्टा…
महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास हेक्टरी फक्त दहा हजारांपर्यंतची मदत जाहीर करून शेतकऱ्याच्या नुकसानीचीही थट्टा केली. संकटकाळात शेतकऱ्याला भुलवून खोटी आश्वासने देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याचा जबाबद्यायला हवा. केवळ पिकांचेच नव्हे, तर शेतजमिनींची धूप झाल्याने जमिनी नापीक झाल्या असल्याने, शेतकऱ्याच्या पुढच्या दहा वर्षांच्या उत्पन्नाचे मार्ग संपुष्टात आले आहेत. त्यामुळे जमिनीच्या मशागतीसाठी हेक्टरी ४० हजार रुपये अतिरिक्त मदत जाहीर करावी अशी मागणीही श्री. लांडगे यांनी केली.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याचे उत्पन्न साफ बुडाले असल्याने, संपूर्ण वर्षाकरिता वीजबील माफ केले पाहिजे, असे ते म्हणाले. संपूर्ण पिके नष्ट झालेली असताना पिकांचे पंचनामे योग्य रीतीने होत नसल्याने, तुटपुंजी मदत देखील शेतकऱ्यास मिळणार नाही, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
























Join Our Whatsapp Group