पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तर कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्याकरिता पिंपरी-चिंचवड नगरीतील वल्लभनगर एसटी आगाराला चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी भेट देऊन संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा व्यक्त केला. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्याचे आश्वासित केले.
आमदार जगताप म्हणाले, एकीकडे कर्मचाऱ्यांना हक्काचा पगार वेळेवर मिळत नाही. ऐन दिवाळीत संशोधित कर्मचाऱ्यांना पगार नसल्यामुळे कुटुंबियांसोबत दीपावली साजरी करण्यास आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले.
दरम्यान जवळपास 27 ते 28 कर्मचाऱ्यांनी आर्थिक परिस्थिती व नैराश्याच्या मानसिकतेतून आत्महत्या केल्याच्या घटना घडत असताना महाविकास आघाडीचे निष्क्रिय सरकार आणि त्यांच्या धोरणांचा कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना भेट देऊन दिलासा दिला.
तसेच एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागणी असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनाच्या परिवहन विभागात विलीनीकरण करून कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी सरकारी सेवेत समावून घेणेबाबत सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना शासन दरबारी त्यांचे प्रश्न मांडण्याची हमी देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना मानसिक पाठबळ देताना नैराश्याच्या खाईत कर्मचाऱ्यांनी न जाता संघटित होऊन संघर्ष करून आपल्या रास्त मागण्या पदरात पाडून घेण्याकरिता कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
याप्रसंगी एसटी कर्मचाऱ्यांच्या शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. सदर प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे उपस्थित होते.


























Join Our Whatsapp Group