पुणे (Pclive7.com):- सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिल्यानंतर जिल्हाभरातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शर्यतींच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. खेड आणि आंबेगाव तालुक्यातून दोन अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून शर्यतींसाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम झाल्यानंतर परवानगी देण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी देत असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाने प्रस्तूत केला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक नागरिक, आयोजक शर्यतींच्या परवानगीसाठी चौकशी करत आहेत. शर्यतींचे आयोजन करण्यासाठी किमान १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. शर्यतींसाठीची नियमावली कृषी व पशुसंवर्धन विभागाने सन २०१७ मध्ये प्रसृत केली आहे. त्यानुसार बैलगाडा आयोजकांकडे सहभागी होणाऱ्या बैलांचे छायाचित्र ४८ तास आधी द्यावे लागणार आहे. तसेच नोंदणीकृत पशुवैद्यकीय यांच्याकडून बैलाची तपासणी करून ते निरोगी असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
खंडोबा देवस्थान असलेल्या निमगाव (राजगुरुनगर), तर आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथून दोन अर्ज बैलगाडा शर्यतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात येत आहे. या नियमावलीनुसार बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातील.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
























Join Our Whatsapp Group