पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर चप्पल भिरकावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी भाजपा सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना याबाबत पत्र देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, रविवारी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी पर्यटन केंद्र, शिवतेजनगर, चिंचवड या महापालिकेच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कार्यक्रम ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. तरीही पोलीस प्रशासनाने याची अपेक्षीत दक्षता घेतली नसल्याचे निदर्शनास येते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर चप्पल फेकण्याचा लाजीरवाणा प्रकार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस सर्व पदाधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करुन कारवाई करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अमोल थोरात यांनी दिला आहे.
अमोल थोरात म्हणाले की, संत तुकोबा, ज्ञानोबाच्या विचारांचा वारसा सांगणारी ही भूमी आहे. देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील वाढता प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार कुटुंबियांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच चप्पल भिरकावण्यासारखा प्रकार केला जात आहे. याला पिंपरी-चिंचवडकर भीक घालणार नाहीत. तसेच, आगामी निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकर राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदानाच्या अधिकाराने निश्चितपणे चप्पलेचा हार घालतील, अशी टीकाही थोरात यांनी केली आहे.