पुणे – आपल्या वस्तूंच्या चोरीची किंवा इतर छोट्यामोठ्या तक्रारी दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा अनुभव तुम्हाला आला असेल. परंतु, पुणे ग्रामीण पोलिसांनी दाखल करून घेतलेल्या एका तक्रारीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांत चक्क चप्पल हरवल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विशाल कालेकर (वय ३६) असे तक्रार दाखल करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
विशाल खेडमधील टाकळकरवाडी रोडवरील पलाश रेसिडन्सीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो. ३ ऑक्टोबरला विशालची नवी कोरी चप्पल त्याच्या घराच्या बाहेरून चोरीला गेली होती. त्यासाठी त्याने पुणे ग्रामीण पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनीही अज्ञाताविरोधात भांदवी कलम ३७९ अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
आम्ही याप्रकरणी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून आमचा तपास सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले. तुम्हाला याआधी असा अनुभव आला आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, कोण कशाप्रकारची तक्रार घेऊन येईल काही सांगता येत नाही.
दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ही घटना सकाळी ३ ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. ३ ऑक्टोबरला काही अज्ञातांनी इमारतीत प्रवेश केला व विशालची नवी कोरी चप्पल चोरली. ही चप्पल ४२५ रुपये किमतीची होती. पोलीस नाईक एस. एम. ढोले या चोरीचा तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group