पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध भागात राबविण्यात आलेली अर्बन स्ट्रीट डिझाइन ही संकल्पना अपयशी ठरलेली आहे. त्यानंतरही आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक थेरगाव हा रस्ता आणि फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली होणारी २५ कोटींची उधळपट्टी त्वरीत थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका माया बारणे यांनी केली आहे.
याबाबत बारणे यांनी महापालिका आयुक्त प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक थेरगाव हा रस्ता आणि फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. मात्र, या रस्त्यावर महापालिकेने २०२१ मध्ये सुमारे ६५ लाख खर्च करून फुटपाथ विकसीत केलेले आहेत. दोन्ही बाजुंचे फुटपाथ सुस्थितीत आहेत.
आदित्य बिर्ला हॉस्पीटल ते डांगे चौक हा मार्ग ३४ मीटर रूंद आहे. हा रस्ता अर्बन स्ट्रिटनुसार विकसीत झाला तर या रस्त्याची रुंदी कमी होणार आहे. या रस्त्यावर चिंचवड ते भुमकर चौक पर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. थेरगाव परिसरात अनेक ठिकाणी डांबरीकरणाने रस्ता उंच झाला आहे व नागरिकांची घरे ही खाली गेलेली आहेत. त्यामळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी जात आहे. त्यामुळे महापालिकेने अर्बन स्ट्रिटवर पैसे खर्च न करता थेरगाव परिसरातील रस्ते कॉक्रिटीकरण करण्यासाठी वापरावे, अशी मागणी माया बारणे यांनी केली आहे.
आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक थेरगाव या रस्त्यावरील फूटपाथसाठी पालिकेने तब्बल ६५ लाखांचा खर्च केला आहे. फूटपाथ सुस्थितीतीत असल्यासंदर्भातचे फोटोही महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहेत. त्यामुळे आणखी २५ कोटींचा खर्च करणे म्हणजे करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्याचा हा प्रकार आहे.– माया बारणे, माजी नगरसेविका