पिंपरी (Pclive7.com):- नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन रिक्षातून आलेल्या अज्ञात टोळक्याने पिंपळे सौदागर येथे सुमारे २५ वाहनांची तोडफोड केली आहे. पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते महादेव मंदिर परिसरात रस्त्यांवर आणि अंतर्गत भागात लावलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे. रिक्षा, टेम्पो, बस, कार आदी वाहनांचा त्यामध्ये समावेश आहे. मध्यरात्री दीड ते दोनच्या दरम्यान झालेल्या या प्रकारामुळे या भागातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
या टोळक्याने कोयते तसेच सिमेंटचे ठोकळे वापरून वाहनांची तोडफोड केली आहे. रस्त्यावर लावलेल्या वाहनांना त्यांनी लक्ष्य केले. बराच वेळ या टोळक्याचा उन्माद सुरू होता. नागरिकांनी याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर, घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. सीसीटीव्हीतील चित्रणाच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
गावगुंडांनी दारू पिऊन हे कृत्य केले असून परिसरात दहशत निर्माण करणे, हाच त्यांचा हेतू असावा. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही अशा घटना घडतात, ही चिंतेची बाब आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी.
– विशाल जाधव, सामाजिक कार्यकर्ते, पिंपळे सौदागर