पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत पालिकेच्या दिवंगत मधुकर पवळे सभागृह पिंपरी येथे धुलीवंदन व होळी निमित्त नैसर्गिक रंग निर्मिती ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला शहरातील विविध शाळेतील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.

या कार्यशाळेचे उदघाटन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले. आधुनिकतेच्या जगामध्ये वावरत असताना अनेक पारंपारिक गोष्टींचा विसर पडत आहे. रासायनिक रंग निर्मिती हा त्यातीलच एक प्रकार. होळी व धुलीवंदन दिवशी आपण अशा अनेक रासायनिक रंगांचा वापर करतो ज्यामुळे शरीराला व निसर्गाला हानी पोहचते, तसेच हे टाळण्यासाठी नैसर्गिक व पारंपारिक रंगांचा वापर करणे गरजेचे आहे पुढील पिढीला नैसर्गिक व पर्यावरण रंगांची ओळख करून देणे आपले कर्तव्य आहे. यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे असे अतिरिक्त आयुक्त वाघ म्हणाले.
यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, माध्यमिक शिक्षण विभागाचे उप आयुक्त संदिप खोत, स्वच्छ भारत समन्वयक तथा सहायक आयुक्त सोनम देशमुख, पर्यावरण संरक्षण गतिविधी पिंपरी चिंचवड जिल्हा संरक्षण ओंकार (सागर) नाझरकर, पर्यावरण संरक्षण गतिविधी चिंचवड गट संरक्षण सुधीर माऊलकर उपस्थित होते. नैसर्गिक रंग निर्मिती प्रशिक्षक प्रिया फुलंब्रीकर यांनी या कार्यशाळेत नैसर्गिक रंग निर्मिती बाबत मार्गदर्शन केले तसेच अनेक वेगवेगळ्या फुलांपासून रंग कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले. द्राक्षांच्या सालीपासून हिरवा रंग बनतो तर कांद्याच्या पातीपासून फिकट गुलाबी रंग बनतो या रंगांचे पाणी निसर्गाला आणि मानवाला दोघांनाही औषध म्हणून वापरण्यात येते. जास्वंदीच्या फुलांचा रंग लाल असला तरी त्याचा काळा रंग तयार होतो कारण त्यामध्ये लोहचे प्रमाण अधिक असते. निसर्गाच्या या रंगांच्या गंमतीजमती मानवाने अनुभवल्या पाहिजेत, निसर्ग समजून घेतला पाहिजे अशा अनेक बाबी त्यांनी सविस्तर सांगितल्या.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांनी केले. त्यावेळी त्यांनी ‘अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा’ या काव्यातून महाराष्ट्राचे केलेल्या वर्णनाचे महत्व सांगितले. पालिकेकडून माझी वसुंधरा अंतर्गत असे अनेक उपक्रम घेण्यात येतात, या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरवासियांनी सहकार्य करावे असेही देशमुख म्हणाल्या.





















Join Our Whatsapp Group