पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवले नाही. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्याचा आरोप करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात बुधवारी (दि.१०) रात्री आंदोलन करीत नार्वेकर आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, मावळ लोकसभेचे संघटक संजोग वाघेरे-पाटील, युवा सेनेचे शहरप्रमुख चेतन पवार, रोमी संधू, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांचा गट नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल देणे अपेक्षित होते. त्यांनी तसे न करता एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला. हा लोकशाहीवरील कलंक आहे. देशातून लोकशाही नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप सचिन भोसले व संजोग वाघेरे यांनी केला.
नार्वेकर, राज्य सरकार व भाजपच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. रास्ता रोको करण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी केला. मात्र, पोलिसांनी अडकाव केल्याने धरणे आंदोलन करीत घोषणाबाजी केली.


























Join Our Whatsapp Group