पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप समर्थक ममता गायकवाड यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे निकटवर्तीय राहुल जाधव यांना डावलून ही निवड करण्यात आली. या निवडीवरून सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रचंड नाराजीनाट्य घडले. लांडगे समर्थक असलेल्या महापौर नितीन काळजे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. तर राहुल जाधव यांनी थेट स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. स्थायीच्या अध्यक्षपदी राहुल जाधव हे प्रबळ दावेदार असताना झालेल्या या घडामोडीमुळे लांडगे समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. सोशल मिडीयावरून समर्थकांनी सत्ताधारी भाजपच्या कार्यपध्दतीवर टिका करत महेश लांडगेंची जोरदार पाठराखण केली आहे.
“माझ्या पक्षाचं नाव दमदार आमदार महेश लांडगे” अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे. महेश लांडगे हे अपक्ष आमदार असल्याच्या पोस्टही सध्या धुमाकूळ घालत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी स्वत:च्या प्रोफाईवर असा फोटो ठेवला आहे. यावरूनच स्थायीतून राहुल जाधव यांना डावलल्यामुळे लांडगे समर्थकांमध्ये कमालीचा ‘असंतोष’ पसरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समर्थकांकडून अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या जोरावर महेश लांडगे आमदार झाले आहेत. स्थायीवरून झालेल्या घडामोडीबाबत स्वत: लांडगे यांनी कोणतेच मत व्यक्त केले नाही. त्यामुळे आता स्थायीच्या निवडणूकीत लांडगे काय भूमिका घेणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जर महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांना मदत केल्यास येत्या काही दिवसात शहर भाजपात नक्कीच भुकंप होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group