पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज आणि उद्या हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त पिंपळे सौदागर जगताप डेअरी चौक येथे लावण्यात आलेला अधिकृत फलक प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान ही कारवाई सुरू असल्याचे समजताच राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकृत फलक असताना कारवाई का करता असा सवाल त्यांनी अधिकार्यांना विचारला. त्यावेळी अधिकार्यांनी सारवासारवीची उत्तरे देत तो फलक पुन्हा लावल्याने या वादावर पडदा पडला. त्यानंतर मात्र सत्ताधारी भाजपच्या सुडबुध्दीच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.
नाना काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत फ्लेक्स उभारू नयेत ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र अधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणे चुकीचे आहे. एकीकडे शहरात सर्रासपणे अनधिकृत फलक लावले जात असताना केवळ सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या फलकावर कारवाई केली जात आहे. राष्ट्रवादीचा शहरात दोन दिवस हल्लाबोल मोर्चा आहे. त्याची धास्ती सत्ताधारी भाजपने घेतली आहे. आज जगताप डेअरी चौकात हल्लाबोलच्या अधिकृत फलकावर प्रशासनाने कारवाई सुरू केली होती. मात्र मी त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांना त्याचे कारणही योग्य पध्दतीने देता आले नाही. सत्ताधार्यांच्या दबावामुळेच ही कारवाई होणार होती. अखेरीस हतबल होऊन अधिकार्यांनी तो फलक पुन्हा लावला.
























Join Our Whatsapp Group