पुणे (Pclive7.com):- शहरातील राज्यपाल निवासस्थान असलेल्या ‘राजभवन’मधील चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी राजभवन परिसरातील चंदनाची ४ झाडे कापून नेल्याचे उघडकीस आले आहे.
या घटनेमुळे राज्यपाल निवासस्थानाची सुरक्षा धाब्यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी याच राजभवनामधील ३ चंदनाची झाडे कापून नेण्यात आली होती. यापूर्वी चोरीच्या घटना घडलेल्या असतानाही या परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही.
चंदनाची झाडे कापल्यानंतर चोरी उघड होऊ नये, म्हणून चोरांनी कापलेल्या झाडाच्या बुंध्यावर कुशन झाकली होती. राजभवनाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पुणे पोलिसांकडून राजभवनाच्या सुरक्षेसाठी असलेल्या ३ पोलीस कॉन्स्टेबलची संख्या कमी करण्यात आली असून आता एकच पोलीस कर्मचारी येथे तैनात आहे. राजभवनपासून चतु:श्रृंगी पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे, असे असतानाही या ठिकाणी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.