पिंपरी (Pclive7.com):- आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणसंग्रामाचे नगारे वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर करताच पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २२ जुलै २०२५ रोजी प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असून त्यावर नागरिक, राजकीय पक्ष, आणि इच्छुक उमेदवारांकडून हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. यानंतर सुनावणी होईल आणि त्यातील अंतिम निर्णयानंतर दि.18 ऑगस्ट रोजी अंतिम मान्यतेसाठी निवडणूक आयोगाला पाठवण्यात येईल. विशेष म्हणजे, दि. 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. त्यामुळे ऑक्टोबर- नोव्हेंबर 2025 मध्ये निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
राजकीय घडामोडींना वेग
प्रभाग रचना ही प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्वात निर्णायक टप्पा मानली जाते. प्रभागांचे विलोपन, विलीनीकरण किंवा नव्याने निर्माण होणारे प्रभाग – या सर्व गोष्टींचा थेट परिणाम राजकीय गणितांवर होतो. त्यामुळे इच्छुक नगरसेवक, माजी पदाधिकारी आणि नवीन उमेदवारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नवीन रचना – नवीन समीकरणं
नवीन प्रभाग रचना ही मतदारसंघांचे स्वरूप बदलण्याचे काम करते. काही प्रभाग अनुसूचित जाती/जमातींसाठी राखीव होतील, काही महिलांसाठी आरक्षित होतील, आणि काही खुल्या प्रभागांमध्ये नव्याने स्पर्धा निर्माण होईल. प्रभाग रचनेनंतर लगेचच निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.