मुंबई (Pclive7.com):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचले आहेत. काही वेळापूर्वीच राज ठाकरे हे दादर मधील त्यांच्या निवासस्थानावरून मातोश्री कडे रवाना झाल्याची माहिती समोर आली होती. राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थाने ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर काही निवडक प्रसंग सोडले तर ते मातोश्रीवर गेले नव्हते. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवर गेले होते तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर पोहोचले आहेत. राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले तेव्हा त्यांनी भावाच्या हातात हात दिला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते.

याप्रसंगी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी संजय राऊत पुढे गेले होते. राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला होता. मातोश्रीवर एकच आवाज घुमल्याचं दिसून आलं. राज ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवून उद्धव ठाकरे यांनी गळा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
























Join Our Whatsapp Group