पुणे (Pclive7.com):- राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आजपासून (दि.१८) पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसराला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर तिकडे रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. परिणामी संभाव्य पावसाची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच नदी काठाच्या नागरिकांनी विशेष सुरक्षा बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’
पुण्याच्या घाट परिसरासाठी पुढील तीन दिवस हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सध्या पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. हवेच्या कमी दाब क्षेत्राचा आस त्याच्या सरासरीच्या जागेपासून दक्षिणेकडे सरकला आहे.

राज्यात कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आला असून, बाजारपेठांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी शेतातही पाणी साचले आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीतील नारंगी नदीला पूर आला असून, जगबुडी नदीचे पाणी थेट खेड शहरात शिरले आहे. गड नदीच्या पुरामुळे संगमेश्वरमधील माघजण बाजारपेठेत पाणी शिरले. गड नदीकाठच्या कासे, कळंबूशी, वडेरू, नाईशी येथील शेती पाण्याखाली गेली आहे. जवळपास सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी गाठल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेडमध्ये पैनगंगा आणि आसना नद्यांना पूर आला आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यात पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. चंद्रपूरमध्ये वर्धा नदीला पूर आल्याने भोळेगाव पूल पाण्याखाली गेला. नागपूरमध्ये नांद नदीच्या पाण्यात दुचाकीस्वार वाहून गेला आहे.

























Join Our Whatsapp Group