पिंपरीतील कचरा संकलन ठप्प; ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची नगरसेवक डब्बू आसवानी यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ह, ब, अ आणि ग प्रभागांतील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या ‘ए.जी. अँथनी वेस्ट’ या ठेकेदार कंपनीकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून नियमित काम होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी यांनी केला आहे. पिंपरी कॅम्प व पिंपरी गाव परिसरात रोज कचरा संकलन न झाल्याने नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.

डब्बू आसवानी यांनी म्हटले आहे की, संबंधित ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कचरा संकलन नियमित केले जात नसल्याचे सांगण्यात आले. तक्रार केल्यावर कंपनीकडून “गाड्या व कर्मचारी कमी आहेत, त्यामुळे रोज कचरा संकलन शक्य होत नाही,” असे उत्तर दिले जाते.
दरम्यान, कचरा संकलनाची समस्या रोज उद्भवत असतानाही महापालिकेकडून संबंधित ठेकेदार कंपनीला नियमितपणे बिले अदा केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. प्रत्यक्षात काम न करता केवळ वेळकाढूपणा सुरू असून, त्यामुळे महापालिकेची फसवणूक होत असल्याचा आरोप नगरसेवक डब्बू आसवानी यांनी केला आहे.

या प्रकरणी ठेकेदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी तसेच महापालिकेची फसवणूक केल्याबाबत ‘ए. जी. अँथनी वेस्ट’ कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नगरसेवक डब्बू आसवानी यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.























Join Our Whatsapp Group