आळंदी (Pclive7.com):- श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीच्या विश्वस्त मंडळाची महत्त्वाची बैठक दि.२३ जानेवारी २०२६ रोजी आळंदी येथे संपन्न झाली. या बैठकीत सन २०२६ या वर्षाकरिता प्रमुख विश्वस्त म्हणून डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीस प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ तसेच सर्व विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, श्री चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, श्री पुरुषोत्तम दादा पाटील आणि ॲड. रोहिणीताई पवार उपस्थित होते. सर्व विश्वस्तांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला.
डॉ. भावार्थ देखणे हे उच्च शिक्षित असून त्यांनी अमेरिकेत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्याकडे तीन पदव्युत्तर पदव्या असून मॅनेजमेंट विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. सध्या ते बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये एच. आर. हेड या पदावर कार्यरत आहेत.

शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रासोबतच डॉ. भावार्थ देखणे हे एक प्रसिद्ध भारुडकार, कीर्तनकार, व्याख्याते, निरुपणकार व प्रवचनकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी मराठी तसेच अमराठी लोकांसाठी महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर व परदेशात इंग्रजी भाषेतही कीर्तने आणि भारुडे सादर केली आहेत. तसेच सन २०२५ च्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात त्यांनी पालखी सोहळा प्रमुख म्हणून यशस्वीपणे कार्य पाहिले होते. संस्थानच्या धार्मिक, सांस्कृतिक व प्रशासकीय व्यवस्थापनात त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास यावेळी विश्वस्त मंडळाने व्यक्त केला आहे.
























Join Our Whatsapp Group