पिंपरी (Pclive7.com):- सिगारेट घेण्यासाठी उतरलेल्या वाहन चालकांवर तीन जणांनी गोळीबार केला. ही घटना वाकड येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.
हरिओम मेहरसिंग सिंग (वय ३० रा. रा. सुतारवाडी, पाषाण. मुळगाव राजस्थान) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावरील वाकड येथील हॉटेल कोल्हापुरी येथे पानटपरीवर सिगारेट घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तिघेजण त्यांच्या मोटारीत येऊन बसले.
हरिओम हे सिगारेट घेऊन पुन्हा मोटारीत आले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या पोटाला पिस्तूल लावले आणि मोटार पुढे घेण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादी हरिओम यांनी ‘काय झाले?’ अशी विचारणा आरोपींना केली. त्यापैकी एकाने ‘तुला मारायचे आहे काय,’ असे म्हटले. यामुळे घाबरलेल्या हरिओम यांनी मोटारीतून उतरून हॉटेलच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी एका आरोपीने हरिओम यांच्यावर गोळीबार केला.
या गोळीबारात हरिओम यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले. माहिती मिळताच वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींच्या शोधासाठी वाकड पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.