पिंपरी (Pclive7.com):- दिव्यांग नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असून, त्यांचे जीवन सुलभ, सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई अशोक पठारे यांनी केले. महानगरपालिका संचलित ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’ ला समितीच्या वतीने सदिच्छा भेट (दि.२७) देण्यात आली. यावेळी संस्थेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी माजी नगरसेविका श्रद्धा रवी लांडगे, महिला व बालकल्याण समितीच्या सर्व सदस्या, दिव्यांग भवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, पूजा भापकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या भेटीदरम्यान सभापती राणीमाई पठारे आणि श्रद्धा लांडगे यांनी दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य सेवा, उपचार पद्धती, पुनर्वसन सुविधा आणि प्रशिक्षण उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती घेत असतानाच, या सेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार कशा करता येतील, यावर त्यांनी भर दिला.

दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या सुविधांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सेवा विस्तारावर विशेष भर देण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने दिव्यांगांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या भेटीमुळे दिव्यांग भवनच्या पुढील उपक्रमांना गती मिळणार असून, प्रशासकीय स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देशही यावेळी सभापती राणीमाई पठारे यांनी दिले.






















Join Our Whatsapp Group