पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात आज दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विविध ठिकाणी आपत्कालीन घटना घडल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी २.१४ ते सायंकाळी ७.२५ या कालावधीत अनेक घटनांची नोंद झाली.

या कालावधीत एका ठिकाणी इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना घडली. तसेच शहरातील विविध भागांत झाडे पडण्याच्या एकूण १७ घटना नोंदविण्यात आल्या. रावेत परिसरात सीमाभिंत कोसळल्याचीही एक घटना समोर आली. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा जखमींची नोंद झालेली नाही. मात्र, काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने झाडाखाली सापडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ हालचाल करत घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान तैनात करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत मदत व बचावकार्य सुरू होते. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






















Join Our Whatsapp Group