आळंदी (Pclive7.com):- आळंदी परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली असून, सहा वर्षीय चिमुकली आणि ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची अज्ञात व्यक्तीने निर्घृण हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धनश्री केदारी (वय ६) आणि संगीता शिंदे (वय ७५) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धनश्रीची आजी संगीता केदारी या रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. काल रात्री त्यांनी नात धनश्रीला शेजारी राहणाऱ्या संगीता शिंदे यांच्या घरी झोपण्यासाठी सोडले होते. मात्र आज सकाळी त्या परत आल्यावर दोघींचीही हत्या झाल्याचे भीषण वास्तव समोर आले. अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेण्याचे काम सुरू असून, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथकेही रवाना करण्यात आली आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group