पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, नागरी विस्तार आणि गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच नव्या पोलिस ठाण्यांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आयुक्तालयातील एकूण पोलिस ठाण्यांची संख्या २३ वरून २८ पर्यंत वाढणार आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी आणि देहूरोड या भागांमध्ये स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर संबंधित भागातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळणे शक्य होणार आहे.

या नव्या पोलिस ठाण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचीही निर्मिती होणार आहे. परिमंडळ ४ साठी ११ पदे, पिरंगुट पोलिस ठाण्यासाठी १९०, जांबे पोलिस ठाण्यासाठी १८९, पिंपळे सौदागर पोलिस ठाण्यासाठी १८३, मोशी पोलिस ठाण्यासाठी १९४ आणि देहुगाव पोलिस ठाण्यासाठी १९४ अशी एकूण ९६१ नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना अधिक जलद पोलीस सेवा मिळणार असून, वाढत्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे. तसेच, स्थानिक पातळीवर गुन्हे नियंत्रण आणि तातडीच्या प्रतिसादातही मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






















Join Our Whatsapp Group