पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “जुने कार्यकर्ते उपाशी, नवीन कार्यकर्ते तुपाशी” अशी भावना निष्ठावंत कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला तीन महिने उलटूनही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या न झाल्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आमदार, खासदार, मंत्री तसेच वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या, मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर झालेला नाही.

जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असून, नव्याने पक्षात दाखल झालेल्या किंवा नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पक्षात गटबाजी वाढत असल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अंतिम निर्णय हा प्रदेश स्तरावरूनच होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावरून ही घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक आमदारांना निर्णय प्रक्रियेत मर्यादित भूमिका असल्याचे कार्यकर्ते सांगतात. दरम्यान, शहरातील चारही आमदार केवळ नावापुरते पक्षाचे काम करत असल्याची टीकाही काही कार्यकर्त्यांनी केली आहे. “ज्यांनी शहरातील नागरी समस्यांसाठी आंदोलने, मोर्चे काढले, प्रसंगी गुन्हे दाखल झाले, त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आज बाजूला केले जात आहे,” अशी खंत व्यक्त होत आहे.

काही कार्यकर्त्यांच्या म्हणणे आहे की, पक्षांतर करून आलेल्या व्यक्तींना महत्त्वाची पदे देण्यात येत असून, जुने कार्यकर्ते केवळ दुय्यम भूमिकेत राहिले आहेत. त्यामुळे सामान्य, प्रामाणिक कार्यकर्ता व्यथित झाला असून पक्षाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडताना पक्ष नेतृत्वाने तातडीने योग्य निर्णय घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
“पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले, आंदोलने केली, जनतेच्या प्रश्नांसाठी लढलो. मात्र आज आम्हालाच डावलले जात आहे. वर्धापन दिनी ही खंत व्यक्त करत आहोत,” अशी भावना भाजपचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी व्यक्त केली.



















Join Our Whatsapp Group