अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबवून नव्या ठेकेदाराची नियुक्ती करा; सुलभा उबाळे यांची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले असून, तीन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ७० टक्केच काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के काम पुन्हा त्याच जुन्या ठेकेदाराकडून करून घेण्याच्या हालचाली पालिकेत सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत जुन्या ठेकेदाराला पुन्हा काम देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यांनी अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबवून नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्याची ठाम मागणी केली आहे.

सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे की, सध्या पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासाठी १६७ दशलक्ष लिटर पाणी आरक्षित असलेल्या भामा आसखेड जलवाहिनीचे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मात्र, कामाची गती अत्यंत संथ राहिल्याने प्रकल्प पूर्ण होण्यास मोठा विलंब झाला आहे.
दरम्यान, मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न केल्याने तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित ठेकेदाराला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही आता पुन्हा त्याच ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुलभा उबाळे यांनी पुढे म्हटले आहे की, नवीन निविदा प्रक्रिया केल्यास वेळ लागेल हे कारण देत जुन्याच ठेकेदाराला काम देणे योग्य ठरणार नाही. त्याऐवजी अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबवून एका महिन्याच्या आत नवीन ठेकेदार नेमून उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे. या मागणीमुळे भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्प पुन्हा चर्चेत आला असून, प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



















Join Our Whatsapp Group