पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख परिसरातील अनधिकृत RMC (रेडी मिक्स काँक्रीट) प्लॅन्टमुळे निर्माण झालेल्या धुळीच्या त्रासावरून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी थेट पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांना रस्त्यावरील धुळ पिशवीत भरून ‘भेट’ दिली आहे.

रविराज काळे यांनी म्हटले आहे की, पिंपळे निलख येथील CNG पंपच्या मागील बाजूस ग्रेस्टोन इन्फ्रा व कार्निवल इन्फ्रा या दोन अनधिकृत RMC प्लॅन्ट सुरू असल्याची तक्रार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने कारवाई करत संबंधित प्लॅन्टला सील लावले होते. मात्र, प्लॅन्ट चालकांनी सील तोडून पुन्हा काम सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या गंभीर प्रकारानंतरही महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कोणतीही गुन्हा नोंद करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) महावितरणला पत्र पाठवून संबंधित प्लॅन्टचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्यानंतर महावितरणने वीज कनेक्शन तोडले आहे.

तरी देखील परिसरातील रस्त्यांवरील धुळीचा त्रास कमी झालेला नाही. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ड प्रभाग कार्यालयात जाऊन आरोग्य विभागाचे अधिकारी व सहाय्यक आयुक्त यांना प्रत्यक्ष धुळ पिशवीत भरून ‘भेट’ देत निषेध नोंदवला.
यावेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू.” दरम्यान, या प्रकारामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अनधिकृत उद्योगांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.



















Join Our Whatsapp Group