
‘त्या’ सर्व उपसूचनांवर भाजप नगरसेवकांच्या सह्या..; सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकातील तब्बल ५२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणात भाजप नगरसेवकांसह आमदारांचाच थेट सहभाग असल्याचा आरोप करत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

शिवसेना उपनेत्या नगरसेविका सुलभा उबाळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक संदीप वाघेरे, निलेश बारणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. यावेळी शिवसेनेच्या नगरसेविका ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सुलभा उबाळे म्हणाल्या की, ३० व ३१ मार्च २०२६ रोजी झालेल्या उपसूचनांच्या आधारे अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात बिले काढण्यात आली. विशेष म्हणजे, या सर्व उपसूचनांवर भाजपच्या नगरसेवकांच्या सह्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात भाजपचा थेट सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही नगरसदस्यांच्या यॉर्डातील विषय नसतानाही उपसुचनांवर सह्या केल्याचे दिसून येते. त्यामुळे या नगरसदस्यांवर कोणाचा दबाव होता का ? किंवा काही अर्थपुर्ण घटना घडल्या का? याबाबत स्पष्टता होत नाही. तसेच काही नगरसदस्यांनी आपल्या सह्या नसल्याचे स्पष्ट केले. तरी खरंच नगरसदस्यांच्या बनावट सह्या कोणी केल्या आहेत का? याबाबतही चौकशी व्हावी व यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भाजपा आमदाराच्या निकटवर्तीय ठेकेदाराचे हित साधण्यासाठीच हा सर्व गैरप्रकार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी, आणि दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
महापालिका प्रशासनानेही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून स्वतंत्र चौकशी समिती नेमावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या आरोपांमुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत हे प्रकरण अधिकच पेटणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



















Join Our Whatsapp Group