पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पीएचडीचे शिक्षण घेत असलेल्या ३० वर्षीय विद्यार्थिनीने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. ए. बिन्नियमिन यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते संबंधित विद्यार्थिनीचे मार्गदर्शक (गाईड) होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी शाहूनगर येथील राहत्या घरी विद्यार्थिनीने आत्महत्या केली. विद्यार्थिनीच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२५ पासून आरोपीकडून अनैतिक वर्तन आणि मानसिक छळ सुरू होता.

आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने लिहिलेल्या चिठ्ठीत तिने या त्रासाचा स्पष्ट उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी आरोपीने स्टॅम्प पेपरवर माफी मागत पुन्हा असे वर्तन करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, झालेल्या मानसिक धक्क्यातून विद्यार्थिनी सावरू शकली नाही.

दरम्यान, न्यायालयाने आरोपी डॉ. बिन्नियमिन यांना १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.





















Join Our Whatsapp Group