पिंपळे सौदागर (Pclive7.com):- जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर पिंपळे सौदागरमधील ‘साई वैभव’ परिसरातील कु. रुग्वेद शशिकांत शेवाळे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याने अत्यंत कठीण समजली जाणारी ‘सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२६’ पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन अमरावतीनगर (तामिळनाडू) येथील सैनिक शाळेत प्रवेश निश्चित केला आहे. रुग्वेदच्या या यशाबद्दल भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते त्याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

देशभरातून सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये रुग्वेदने लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्याबरोबरच वैद्यकीय चाचणीही यशस्वीरीत्या पार केली. विशेष म्हणजे, त्याने सैनिक शाळेसोबतच जवाहर नवोदय विद्यालय आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूल या प्रतिष्ठित संस्थांच्या प्रवेशासाठीही पात्रता मिळवत ‘तिहेरी’ यश संपादन केले आहे.

यावेळी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवणे, ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. रुग्वेदने आपल्या कुटुंबासह संपूर्ण परिसराचे नाव उंचावले आहे. भविष्यात तो एक उत्कृष्ट लष्करी अधिकारी बनून देशाची सेवा करेल, असा विश्वास आहे.”

या प्रसंगी रुग्वेदचे वडील शशिकांत शेवाळे, कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. रुग्वेदच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याने इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
Tags: shatrughna kate



















Join Our Whatsapp Group