‘हास्यजत्रे’तून घराघरात, ‘सम्या-सम्या’ जगभरात
– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- समीर चौघुले.. एकांकिका, नाटक, चित्रपट, मालिका अन् महाराष्ट्राची हास्यजत्रा.. घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता.. तीन दशकांच्या अथक परिश्रमानंतर मिळालेली अफाट लोकप्रियता.. केवळ विनोदीच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत चपखल बसू शकणारा ताकदीचा अष्टपैलू अभिनेता..! ‘विणुया अतूट नाती’ अशी साद घालत आठ वर्षापूर्वी ‘सोनी मराठी’ वाहिनी सुरू झाली. तेव्हापासून या वाहिनीवर सुरू झालेली आणि सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली हास्यमालिका म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’..!

प्रसिध्द दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सिध्दहस्त लेखक सचिन मोटे यांच्या ‘वेटक्लाऊड प्रॉडक्शन’ मार्फत निर्मिती केलेल्या हास्यजत्रेने प्रेक्षकांची मने जिंकत प्रचंड लोकप्रियता मिळवली. जगभरातील लाखो रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतानाच अनेकांना आर्थिक स्थैर्य दिले. करिअर घडवले. समाजात मान- सन्मान मिळवून दिले. ‘यदा कदाचित’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची एक्सप्रेस’ ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.. अशी जवळपास ३० वर्षे निर्धारपूर्वक वाटचाल करत असलेला एक गुणी अभिनेता याच हास्यजत्रेमुळे घराघरात पोहोचला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला…तो अभिनेता म्हणजे समीर चौघुले..!
‘सम्या सम्या मैफलीत माझ्या’ या नावाचा एकपात्री अभिवाचनाचा धम्माल विनोदी कार्यक्रम समीर चौघुले यांनी अलीकडेच सुरू केला आहे आणि
अल्पावधीतच तो रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात जिथे-जिथे ‘सम्या सम्या’चे प्रयोग होत आहेत, तिथे-तिथे मराठी प्रेक्षकांकडून दणदणीत प्रतिसाद मिळतो आहे.

असे काय आहे, या कार्यक्रमात…
‘सम्या सम्या मैफलीत माझ्या’ म्हणजे केवळ समीर चौघुले यांच्या अभिनयावर आणि संवादावर आधारलेला खुसखुशीत विनोदी ढंगाचा कार्यक्रम आहे. कोणतीही मोठी नेपथ्य व्यवस्था नाही, झगमगती प्रकाशयोजना नाही. स्टेजवर एक खुर्ची, छोटासा टेबल असतो. तांब्याभर पाणी ठेवलेले असते.
दोन तास चालणाऱ्या या अभिवाचनात समीर चौघुले आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनुभव, मनुष्य स्वभाव, नातेसंबंधातील हलके-फुलके क्षण हळूवारपणे उलगडतात. अत्यंत आपुलकीने पण विनोदी शैलीत मध्यमवर्गीयांच्या जीवनातील टप्पे सांगतात. स्वत:चे धम्माल किस्से, गप्पा आणि कथाकथनातून कार्यक्रम रंगतदार होतो.
प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा, लहानांपासून थोरांना मनमुराद आनंद देणारा हा कार्यक्रम आहे.
विनोद, सूक्ष्म निरीक्षण आणि जीवनातील छोट्या-छोट्या प्रसंगांतील गंमत यांचा सुरेख मिलाफ यात दिसतो. ‘सम्या सम्या’ केवळ हसवणारा कार्यक्रम नाही, तर प्रेक्षकांना स्वतःकडे तटस्थपणे पाहायला लावणारा, अंतर्मुख करणारा ठरतो.
एकपात्री प्रयोग हा प्रकार मुळातच आव्हानात्मक आहे. संपूर्ण रंगमंचावर एकट्याने वावरणे, प्रेक्षकांना दोन तास खिळवून ठेवणे, त्यांना मनमुराद हसवणे, वेळप्रसंगी भावनिक क्षणही देणे, ही खरंतर तारेवरची कसरत असते. समीर चौघुले यांनी आपल्या अभिनयकौशल्याच्या आणि अचूक संवादफेकीच्या जोरावर हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. आजच्या सोशल मिडियाच्या वेगवान युगात काही सेकंदांचे रीलही पूर्णपणे न पाहणारा व्यक्ती दोन तासाच्या कार्यक्रमात, निखळ हास्यकल्लोळात पूर्णपणे रमतो, हेच ‘सम्या सम्या’चे यश आहे.

या कार्यक्रमाने अल्पावधीत प्रयोगांचे शतक गाठले आहे. शनिवारी, १८ एप्रिलला पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात ९९ वा आणि रविवारी १९ एप्रिलला मुंबईत यशवंत नाट्यगृहात शतकमहोत्सवी प्रयोग होतोय. एखाद्या कलाकृतीने इथपर्यंतचा टप्पा गाठणे म्हणजे परिश्रम, सातत्य आणि रसिकांच्या प्रेमाची पावतीच आहे. मराठी रंगभूमीसाठी ‘सम्या सम्या’ची लोकप्रियता आश्वासक आहे, प्रेरणादायी आहे. अशा आशयघन प्रयोगांची परंपरा अधिक बळकट व्हायला हवी. ‘सम्या सम्या मैफलीत माझ्या’ची झेप शंभरावरून ‘सहस्रसोहळ्या’पर्यंत जावी. प्रत्येक मैफल अधिकाधिक रंगतदार व्हावी, अशीच प्रत्येक मराठी प्रेक्षकांची समीर चौघुले यांना मन:पूर्वक शुभेच्छा असणार आहे.





















Join Our Whatsapp Group