पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेकडून स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात आता थेट दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय (रहाटणी) अंतर्गत वॉर्ड क्रमांक २६ मधील कावेरी नगर (वाकड रोड) परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घरगुती कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांकडून वारंवार सूचना देऊनही काहीजण शिळे अन्न, भाज्या, कपडे तसेच प्लास्टिकच्या पिशव्यांमधील कचरा रस्त्यावर फेकत असल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होत होती.

विशेषतः सकाळी शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या काही महिला तसेच कामावर जाताना दुचाकीवरून नागरिकांकडून हा कचरा टाकला जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून दुर्गंधी आणि घाणीचे प्रमाण वाढले होते.

या पार्श्वभूमीवर प्रमुख आरोग्य निरीक्षक निलेश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन मार्शल पथकातील शुभम मोहिते आणि राज चव्हाण यांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली.

महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, घरगुती कचरा फक्त अधिकृत घंटागाडीमध्येच द्यावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून शहर अस्वच्छ करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.




















Join Our Whatsapp Group