एकहाती सत्ता ते ‘शून्या’पर्यंतचा प्रवास; अस्तित्वासाठी धडपड, गतवैभवाचे दिवास्वप्नच..!
– बाळासाहेब जवळकर –
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडच्या विकासाची खऱ्या अर्थाने पायाभरणी करणाऱ्या काँग्रेस पक्षाने वर्षानुवर्षे महापालिकेवर निर्विवाद सत्ता गाजवली. तरीही राजकीय बालेकिल्ला असलेल्या या शहरात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसला आज झगडावे लागते आहे. एकहाती सत्ता ते शून्य नगरसेवक अशी उतरती कळा लागणे, निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारही न मिळणे, संघटना कोलमडणे, अशी वाताहात होण्यामागे पक्षातील अंतर्गत लाथाळ्या, गटबाजीचे राजकारण आणि स्थानिक नेतृत्वाइतकेच पक्षाच्या ‘हायकमांड’चे अक्षम्य दुर्लक्ष जबाबदार असल्याची तीव्र भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.

काँग्रेस आणि पिंपरी-चिंचवड शहर हे अतूट समीकरण आहे. आजमितीला पिंपरी-चिंचवडला जे वैभव प्राप्त झाले, नावलौकिक मिळाला आहे. शहराची विकासात्मक जडणघडण झाली, त्याची पायाभरणी काँग्रेस पक्षामुळे झाली आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. सद्यस्थितीत शहर पातळीवर काँग्रेस पक्ष औषधालाही शिल्लक राहिलेला नाही, ही वस्तुस्थिती लपवता येणार नाही. वर्षानुवर्षे पिंपरी-चिंचवडचे सत्ताकारण ज्या काँग्रेस पक्षाभोवती केंद्रीत होते. महापालिकेत निर्विवाद सत्ता होती. महत्त्वाची सगळीचं पदे काँग्रेसकडे होती. अशा ताकतीच्या राष्ट्रीय पक्षाची अवस्था आज दयनीय आहे. १२८ सदस्यसंख्या असलेल्या पालिकेत काँग्रेसला एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. पक्षसंघटना पूर्णपणे विस्कळीत आहे. पक्षाचे उरले-सुरले अस्तित्व टिकवण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत.
शहर काँग्रेसची झालेली दुरवस्था एकाच दिवसात झालेली नाही. टप्याटप्प्याने पक्षाला उतरती कळा लागली. त्या-त्या वेळी उपाययोजना होणे गरजेचे होते, ती झाली नाही. काँग्रेस ‘हायकमांड’ने कधीही पिंपरी-चिंचवडकडे लक्ष दिले नाही. परिणामी, काँग्रेसचे न भरून येणारे नुकसान होतच राहिले. प्रचंड जनाधार असलेला, निष्ठावान कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असलेला हा पक्ष राजकीयदृष्ट्या शक्तीहीन बनला.
एकत्रित पक्ष होता, तोपर्यंत काँग्रेसचा बोलबोला होता. १० जून १९९९ रोजी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यातून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या प्रभावामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा गट राष्ट्रवादीत गेला. दुसरीकडे, अशा कठीण प्रसंगातही प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शर्थीचे प्रयत्न करून पक्षाचा बालेकिल्ला सांभाळला. मोरे यांच्या समन्यायी नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते काँग्रेस पक्षातच राहिले. तत्कालीन परिस्थितीत राष्ट्रवादीचे पारडे जड होते. मात्र, राजकारणातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या मोरे यांनी पवारांच्या राजकारणाला काटशह देत शहर काँग्रेसची गळती थांबवली.
विभाजनानंतर २००२ च्या महापालिका निवडणुकीत प्रथमच दोन्ही काँग्रेस आमने-सामने लढले. तेव्हा रंगलेला राजकीय सामना एकतर्फी न होता, बरोबरीत सुटला. पिंपरी पालिकेतील १०५ पैकी ३२ जागांवर काँग्रेसला यश मिळाले. प्रा. मोरे यांनी केलेली योग्य उमेदवारांची निवड आणि नियोजनबध्द प्रचारयंत्रणा हे त्यामागचे कारण होते. त्यामुळे ३६ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस पक्षाला बरोबर घ्यावेच लागले आणि सत्तेतील निम्मा वाटाही द्यावा लागला. नंतर, नोव्हेंबर २००३ मध्ये प्रा. मोरे यांचे निधन झाले. त्यानंतर, पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी काही महिने व मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम यांच्याकडे काही काळ नेतृत्वाची धुरा होती. मात्र, त्यांचे नेतृत्व स्थिरावले नाही आणि स्थानिक पातळीवर कोणी ते स्वीकारलेही नाही.

या काळात महापालिकेचा कारभार पूर्णपणे अजितदादांच्या हातात आला होता. त्यांच्या झंझावातापुढे काँग्रेस नेत्यांचा निभाव लागला नाही. प्रदेश स्तरावरील काँग्रेस नेत्यांनी इथे लक्ष घालून अजितदादांशी संघर्ष करण्याचा प्रयत्नही केला नाही. पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाची काय हाल-हवा आहे, याची चौकशी काँग्रेस नेतृत्वाने कधी केली नाही. ताकद देणे तर खूप दूरची गोष्ट होती. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. २००२ मध्ये असलेली नगरसेवकांची ३२ ही संख्या २००७ मध्ये १९ झाली. २०१२ च्या निवडणुकीत १२८ पैकी १४ नगरसेवक निवडून आले. सर्वात वाईट स्थिती म्हणजे २०१७ आणि २०२६ च्या पालिका निवडणुकीत १२८ पैकी एकही जागा जिंकता आली नाही. या दोन्हीही निवडणुकीत काँग्रेसला उमेदवार देखील मिळत नव्हते. त्यामुळे पूर्ण जागा लढवता आल्या नाहीत.
ज्या काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरावर एकहाती राज्य केले. त्यांना खाते उघडता येऊ नये, निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारही मिळू नयेत, या दुरवस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जातो. तेव्हा कार्यकर्ते सर्रास ‘हायकमांड’कडे बोट दाखवतात. गेल्या कित्येक वर्षात काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने कार्यकर्त्यांना वेळ दिला नाही. सत्ताकाळात एखादी आमदारकी, खासदारकी किंवा महामंडळही दिले नाही. पक्षसंघटना वाढण्यासाठी काहीही मदत केली नाही. गटबाजी मोडून काढण्याऐवजी खतपाणी घालण्याचे काम केले. त्यामुळे पक्षाची वाढ खुंटली. शहरात काँग्रेस पक्षाची ताकद अशी उरलीच नाही. संपूर्ण शहरभरात चालू शकेल, भक्कम नेतृत्व देऊ शकेल, असा चेहरा पक्षाकडे नाही. लोकाश्रय असलेले चांगले कार्यकर्ते पक्ष सोडून गेले. गटबाजीला ऊत आलेलाच आहे. समन्वयाचा अभाव आहे. मित्र पक्षांवर अवलंबून राहिल्याचा कायम फटका बसला आहे. पक्षाचे निरीक्षक येतात, पाहुणचार झोडतात, बैठक-बैठक खेळतात, कागदी घोडे नाचवून निघून जातात. प्रत्यक्षात ठोस कृती काही करत नाहीत. नियमितपणे आढावा घेतला जात नाही की पाठपुरावा केला जात नाही. कार्यकर्त्यांना काय हवे, काय नको, याची विचारणा होत नाही. त्यामुळे पक्षात शिथीलता आहे, कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आहे.

उशिरा सुचलेले शहाणपण..
उशिरा का होईना, काँग्रेस नेतृत्वाला शहाणपण सुचले. आता सर्वत्र संघटनात्मक बांधणीच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी शहरात नव्याने निरीक्षक आले. शहराध्यक्ष, महिलाध्यक्षासह कार्यकारिणीतील इतर पदांसाठी त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पक्षासाठी शहरात कसे वातावरण आहे. संघटना वाढीसाठी, पूर्वीचे वैभव प्राप्त करून घेण्यासाठी काय करावे लागेल. युवकांना पक्षाकडे कसे आकृष्ट करता येईल. शहरातील महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत, शहरात कोणत्या सोयीसुविधांची आवश्यकता आहे, असे अनेक प्रश्न विचारत निरीक्षकांनी सविस्तर माहिती घेतली. या मुलाखतींच्या आधारे इच्छुकांचे गुणांकन करण्यात येणार आहे.
कोणाची वर्णी लागणार..
बाबू नायर, विष्णूपंत नेवाळे, तुकाराम भोंडवे, नरेंद्र बनसोडे, मनोज कांबळे, गिरीजादेवी कुदळे, संदेश नवले, निखील भोईर यांच्यासह अनेकजण शहराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. वेळप्रसंगी पृथ्वीराज साठे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. नेमकी कोणाची वर्णी लागणार, त्यासाठी कोणते निकष लावले जाणार, याकडे काँग्रेस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आता तरी सुधारणा करा…
भाजपला समर्थ पर्याय केवळ काँग्रेस पक्षच देऊ शकतो, असे वातावरण सगळीकडे आहे. मात्र, जागोजागी काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. उदाहरण म्हणून पिंपरी-चिंचवड काँग्रेसकडे पाहता येईल. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाचे गतवैभव पुन्हा मिळवायचे असेल, पालिकेत पुन्हा बस्तान बसवायचे असेल तर पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातले पाहिजे. पुढील काळात राजकीयदृष्ट्या पिंपरी-चिंचवडचे महत्त्व खूपच वाढणार आहे. बलाढ्य भाजपची निवडणुकांच्या दृष्टीने बाराही महिने मोर्चेबांधणी सुरू असते. त्यांच्याशी दोन हात करणे सोपे नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना केवळ उपदेशांचे डोस न पाजता पक्षश्रेष्ठींनी खऱ्या अर्थाने ताकद दिली पाहिजे, आवश्यक रसद पुरवली पाहिजे. तरच भविष्यकाळात काँग्रेसचा काहीतरी निभाव लागेल. अन्यथा, पिंपरी-चिंचवड शहर नक्कीच ‘काँग्रेसमुक्त’ होईल, हे सांगायला ज्योतिषाची गरज पडणार नाही.




















Join Our Whatsapp Group