पिंपरी (Pclive7.com):- यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी आज रुग्णालयाचा सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करत त्रुटी दूर करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

अभिषेक बारणे यांनी रुग्णालयातील सर्व संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांच्या समवेत ४ थ्या मजल्यावरील वॉर्डची सविस्तर पाहणी केली. यावेळी रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेताना त्यांनी वॉर्डातील अत्यावश्यक सोयी, वैद्यकीय उपकरणांची स्थिती आणि लिफ्टच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांची दखल घेतली. लिफ्ट दुरुस्तीबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता, याबाबत तातडीने कार्यवाही करून रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्याचे आदेश त्यांनी दिले.
रुग्णालयावर वाढणारा रुग्णांचा भार विचारात घेता, परिसरातील मोकळ्या जागेचा प्रभावी वापर करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. या जागेत इमारतींचा विस्तार करून नवीन आरोग्य सेवा सुरू करण्याच्या शक्यता त्यांनी पडताळून पाहिल्या. रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी टॉयलेट स्वच्छता, बेडची व्यवस्था आणि सुरळीत पाणीपुरवठा यांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच विद्युत विभाग आणि अग्निशमन यंत्रणेची सुरक्षाविषयक मानके तपासून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

रुग्णालयातील औषध साठा आणि वैद्यकीय उपकरणांच्या साठवणूक (स्टोरेज) विभागाची पाहणी करताना बारणे यांनी औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. सामान्य रुग्णांना वेळेवर औषधे मिळतील आणि कोणत्याही उपकरणाच्या अभावी उपचार थांबणार नाहीत, यासाठी योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सामान्य नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी आहे. वायसीएम हे शहरातील महत्त्वाचे रुग्णालय असून येथील सेवा दर्जेदार राखण्यासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. या पाहणी दौऱ्यामुळे रुग्णालयातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका.




















Join Our Whatsapp Group