नवी सांगवीतील ‘रोजगार मेळाव्यात’ १५४७८ पदांसाठी थेट मुलाखती
चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून युवकांच्या स्वप्नांना रोजगारांचे पंख देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा गुरुवारी (दि. १४) पार पडला. चिंचवड मतदार संघातील नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलमध्ये पार पडलेल्या आजच्या मेळाव्यामध्ये १५४७८ युवक युवतींनी रोजगारासाठी नोंदणी केली विविध १२० कंपन्यां मध्ये या युवकांच्या मुलाखती पार पडल्या. यामध्ये ७ हजाराहून अधिक युवक युवतींना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.

दरम्यान “आजच्या बदलत्या काळात केवळ पदवी असून चालत नाही, तर त्याला ‘स्किल डेव्हलपमेंट’ची अर्थात कौशल्य विकास जोड असणे ही काळाची गरज बनली आहे. भारताला आत्मनिर्भर आणि विकसित बनवण्याचे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत आहे. हे स्वप्न केवळ आपल्या युवाशक्तीच्या आणि त्यांच्या हातातील कौशल्याच्या बळावरच साकार होऊ शकते,” असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग उपायुक्त अनुपमा पवार, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सु. रा. वराडे, पिंपरी चिंचवड महापालिका पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी व्यासपीठावर स्थानिक पदाधिकारी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी आमदार जगताप म्हणाले, “आज पुणे हे जागतिक पातळीवर ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ (जीसीसी) म्हणून उदयास येत आहे. या पुण्याच्या ग्रोथ हब साठी केंद्र सरकारकडून ६,००० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे, कारण येथे रोजगाराच्या उदंड संधी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे पुणे-मुंबई अंतर कमी झाले नसून, ती पुण्याच्या विकासाची ‘अपॉर्च्युनिटी लिंक’ ठरली आहे.” “भारताच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के असून, यामध्ये एमएसएमई आणि स्टार्टअप्सचे योगदान मोठे आहे. जेव्हा राज्याचे नेतृत्व दावोस येथे जाते, तेव्हा देशात येणाऱ्या एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी एकटा महाराष्ट्र ३७ टक्के गुंतवणूक खेचून आणतो. मुंबईनंतर पुण्यात गुंतवणुकीचा ओघ सर्वाधिक असून, या उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याचे काम या रोजगार मेळाव्यातून होत आहे,” असेही आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.

गेल्या ११ वर्षांपासून असे रोजगार मेळावे आम्ही आयोजित करत असल्याचे सांगून आमदार जगताप म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रोजगाराची संधी पोहोचावी, या ‘अंत्योदय’ भावनेतून आम्ही काम करत आहेत,” “महाराष्ट्र सरकार ५ ट्रिलियन इकॉनॉमीचे उद्दिष्ट ठेवून काम करत असून राज्याची अर्थव्यवस्था सध्या ६६ अब्ज डॉलरवर पोहोचली असल्याचे आमदार जगताप म्हणाले.
उपायुक्त अनुपमा पवार म्हणाल्या की, “रोजगार मेळावा ही तरुणांसाठी यशाची पहिली पायरी आहे. मिळालेल्या संधीचा स्वीकार करून प्रवासाला सुरुवात करावी आणि मग ध्येय गाठावे. मात्र, आजच्या युवा पिढीला ‘इन्स्टंट’ यश हवे असते. तरुणांनी एखाद्या संस्थेत प्रवेश करून आधी स्वतःला सिद्ध करावे आणि मग पंख पसरावे. आधीच पंख पसरून भरारी घेण्याचा प्रयत्न केल्यास धडपडण्याची शक्यता अधिक असते.” शिक्षण घेता घेता विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, हाच केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणात पवार यांनी दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. “युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी दिवंगत लक्ष्मण जगताप नेहमीच प्रयत्नशील असायचे. गंभीर आजारपणाशी झुंज देत असतानाही, गेल्या वेळच्या रोजगार मेळाव्यात ते ऑनलाइन सहभागी झाले होते. यावरूनच त्यांची युवकांविषयीची असलेली अथांग तळमळ दिसून आली,” अशा भावूक शब्दांत त्यांनी लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा गौरव केला.
महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी म्हणाले की, “हा रोजगार मेळावा खऱ्या अर्थाने येथे आलेल्या उमेदवारांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण घेऊन आला आहे. घरातील सदस्याला नोकरी मिळणे कुटुंबासाठी किती महत्त्वाचे असते, हे मी जाणतो. आई-वडिलांनी कष्टाने दिलेल्या शिक्षणाचे उमेदवारांनी सोने करावे.” स्वतःचे उदाहरण देत आयुक्त म्हणाले, “मी एका छोट्या गावातून आलेलो आहे. त्यामुळे पुण्यासारख्या औद्योगिक आणि शैक्षणिक हबमध्ये राहणारा येथील प्रत्येक तरुण भाग्यवान आहे, कारण त्याला शिक्षण, रोजगार आणि इंडस्ट्री सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध झालं आहे. आजच्या उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे. केवळ नोकरी मिळवणे पुरेसे नाही, तर ती टिकवणे आणि कामगिरी सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. ज्या भागात कुशल मॅनपावर उपलब्ध असते, तिथून कंपन्या कधीही स्थलांतरित होत नाहीत. त्यामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींसमोर आगामी काळात ‘स्किल मॅनपावर’ घडवण्याचे मोठे आव्हान असेल.”
कार्यक्रमांमध्ये कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री ॲड. मंगल प्रभात लोढा यांचा शुभ संदेश कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी मनोजकुमार मारकड, भारत मदने यांनी पुढाकार घेतला . सहभागी सर्व युवक-युवतींना आयोजकांच्या वतीने विशेष ‘सहभाग प्रमाणपत्र’ देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. आभार सहाय्यक आयुक्त सु.रा. वराडे यांनी मानले.




















Join Our Whatsapp Group