पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे यांनी आज सायकलवरून महापालिकेत जात पर्यावरणपूरक संदेश दिला. मुख्यमंत्री स्तरावर सुरू झालेल्या या उपक्रमाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनही प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

महापौर रवि लांडगे यांनी केवळ एक दिवस सायकल चालवून थांबणार नसून, आठवड्यातून किमान एक दिवस सायकलवरूनच कामकाज करण्याचा निर्धार व्यक्त केला. “मी पदावर असेपर्यंत या उपक्रमाचे अनुकरण करणार असून नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्वी सुरू झालेली मात्र नंतर बारगळलेली शेअरिंग सायकल योजना नव्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर सायकल ट्रॅक उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
महापौरांच्या या उपक्रमामुळे शहरात पर्यावरणपूरक वाहतुकीबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून नागरिकांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.




















Join Our Whatsapp Group