पिंपरी (Pclive7.com):- पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाचा आधार घेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आज (दि.१५) थेट बैलगाडीतून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रवेश करत सत्ताधारी भाजपवर जोरदार राजकीय निशाणा साधला. एका बाजूला देशहितासाठी खर्चाला लगाम घालण्याची भाषा केली जाते, तर दुसऱ्या बाजूला पालिकेत पदाधिकाऱ्यांच्या सुविधा, दौरे आणि सुरक्षेवर कोट्यवधींची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने महापालिकेच्या आवरात बैलगाडीतून येऊन एक अनोखं आंदोलन छेडले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी प्रभाग क्रमांक ३० मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती माई काटे, प्रतीक्षा जवळकर आणि नगरसेवक राजू बनसोडे हे बैलगाडीतून महापालिकेत दाखल झाले. पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि बैलगाडीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आंदोलनाने महापालिका परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली. नागरिक आणि कर्मचाऱ्यांनीही हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी केली होती.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी यावेळी भाजपवर थेट टीका करत, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकप्रतिनिधींना काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्याच्या नेमकं उलट चित्र दिसत आहे. आर्थिक परिस्थिती डळमळीत असल्याचे सांगितले जाते, पण दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये, परदेश दौरे आणि अनावश्यक खर्च सुरूच आहेत,” असा आरोप केला.

महापालिकेतील अलीकडील काही निर्णयांचा उल्लेख करत राष्ट्रवादीने भाजपच्या कारभारावर ‘दिखाऊ विकास’ आणि ‘प्रसिद्धीचा हव्यास’ अशी टीका केली. सामान्य नागरिकांना पाणी, रस्ते, वाहतूक आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांना सामोरे जावे लागत असताना, सत्ताधारी मात्र जनतेच्या पैशांवर ऐशोआराम करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
बैलगाडीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आंदोलनातून ग्रामीण संस्कृती, साधेपणा आणि इंधन बचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. “ही केवळ प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी नसून सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेविरोधातील निषेध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र राष्ट्रवादीच्या या आंदोलनामुळे महापालिकेतील खर्च, पदाधिकाऱ्यांच्या सुविधा आणि आर्थिक प्राधान्यक्रम यावर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.




















Join Our Whatsapp Group